नगर : काँग्रेसने केलेल्या कारवाईवर सत्यजीत तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नियमांची पायामल्ली करून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे, योग्य वेळी मी यावर उत्तर देईन, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांचं निलंबन केले आहे. या निलंबनानंतर सत्यजीत तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
तांबे म्हणाले, देशभर मी काँग्रेस पक्षासाठी काम केलं, गेल्या 22 वर्षांपासून संघटनेसाठी माझे काम आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षांतर्गत प्रक्रिया आणि शिस्तपालन समितीचे नियम आहेत. सर्व नियमांची पायामल्ली केली गेली आहे. माझ्याकडे खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे,' अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
2030 साली आपल्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. आमच्या श्वासात आणि रक्तात काँग्रेस पक्ष आहे, पण अशी भूमिका घेताना दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्या होत्या, दुर्दैवाने असं झालं नाही, असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्जच भरला नाही.
सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अर्ज दाखल केला, पण त्यांना काँग्रेसने एबी फॉर्मच दिला नव्हता, त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांनी घेतलेल्या या भूमिकमुळे त्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.

Post a Comment