नगर ः कोठला, राज चेंबर येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कारवाई करून 11 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून मुबारक फारूख शेख (वय 21 रा. कोठल, झोपडपट्टी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कोठला परिसरात राज चेंबरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, महिला अंमलदार संपदा तांबे, अंमलदार कोतकर, तरटे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पथकाने सायंकाळी कोठला परिसरात जाऊन हुक्का पार्लरचा शोध घेत छापा टाकला. तेथे मुबारक फारूख शेख हा मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्यासह एकुण 11 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment