नगर : बाबुर्डी बेंद (ता. नगर) शिवारात शेतीच्या वादातून बुधवारी (ता. ८) तुफान राडा झाला. नगरमधील बांधकाम व्यावसायिक व शेती मालक व त्याच्या साथीदारांवर २० ते २५ जणांच्या जमावाने तुफान दगडफेक केली. एकावर कोयत्याने वार करत त्याच्या जवळ असलेली परवाना असलेली रिव्हॉल्वर हिसकावून घेत त्याच्या डोक्यास लावून ठार मारण्याचीही धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ५ जणांना पकडले असून आरोपींनी पळविलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.
याबाबत नगरमधील शेती व बांधकाम व्यावसायिक उत्कर्ष सुरेश पाटील (वय ४४, रा.श्रमिक, आनंदऋषीजी मार्ग,अहमदनगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पाटील यांची नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात शेत जमीन आहे. बुधवारी (दि.८) दुपारी १२ च्या सुमारास ते बाबुर्डी बेंद शिवारात हॉटेल राजवीर जवळ असलेल्या त्यांच्या शेतात काही सहकाऱ्यांसह गेले होते.
त्यांच्या जमिनीत असलेले पत्र्याचे शेड जेसीबी च्या सहायाने काढत असताना तेथे राजवीर हॉटेलचा मालक मनोज चोभे (रा.बाबुर्डी बेंद,ता.नगर) याच्यासह २० ते २५ जण आले. त्यांनी पाटील यांच्याशी जमिनीवरून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने या जमावाने पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर तुफान दगडफेक सुरु केली.
तसेच मनोज चोभे याने अगोदर लोखंडी गजाने पाटील यांच्या हातावर व अंगावर मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमधून चिकन कापण्याचा कोयता आणून पाटील यांच्या मांडीवर, उजव्या पायाच्या गुडघ्यावर, पाठीवर, बरगडीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले.
त्यामुळे पाटील गंभीर जखमी झाले. याच गडबडीत पाटील यांच्या कमरेला अडकवलेली स्व संरक्षणासाठी अधिकृत परवाना असलेली रिव्हॉल्वर मनोज चोभे याने हिसकावून घेत पाटील यांच्या डोक्यास लावून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
हा सर्व तुफान राडा सुरु असताना कोणीतरी पोलिसांना फोन केला. हे समजताच मनोज चोभेसह सर्वजण पाटील यांची परवाना असलेली रिव्हॉल्वर घेवून तेथून पसार झाले. थोड्याच वेळात नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे पोलीस पथकासह तेथे दाखल झाले.
त्यांनी आरोपींची धरपकड सुरु केली. सायंकाळ पर्यंत यातील ५ आरोपींना पकडण्यात आले असून फिर्यादी पाटील यांची आरोपींनी पळवून नेलेली परवाना असलेली रिव्हॉल्वर आरोपींकडून हस्तगत करण्यात आली असल्याचे स.पो.नि.सानप यांनी सांगितले.
Post a Comment