नगर : आम्ही विधानसभेला ठरवले होते शिवाजी कर्डिले यांना पराभूत करायचे. ते आम्ही करूनच दाखविले आहे. आम्ही जे बोललो ते करून दाखवतोच, असे प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.
चिचोंडी पाटील येथील सरपंच, उपसरपंच पदग्रहन प्रसंगी ते बोलत होते. चिचोंडी पाटील (ता. नगर) गावच्या सरपंच व उपसरपंच पदाचा पदभार समारंभ आमदार लंके यांच्या उपस्थितीत झाला. सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री कोकाटे यांनी पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार साहेबराव दरेकर, काँगेस तालुका अध्यक्ष संपत म्हस्के, युवा नेते प्रवीण कोकाटे आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले की, आम्ही शिवाजी कर्डिलेंना राहुरी विधानसभा मतदार संघात पाडायचे ठरवले आणि पडलेच. आम्ही बोलतो ते करतोच. आता आम्ही श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात घनश्याम शेलार यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील.
तालुक्यातील जनतेचा पूर्वीपासून महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती जनतेतून असल्यामुळे आपले सगळे उमेदवार विजयी होतात, मात्र आपण नगर बाजार समितीसाठी मोजकेच मतदान असते अशा निवडणुकीत कमी पडतो. यावेळेस जास्त ताकद लावली तर नगर बाजार समितीवर सुद्धा आपलीच सत्ता येईल, असे ते म्हणाले.
Post a Comment