संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे उस तोडणीसाठी आलेल्या उस तोडणी मजुराच्या नऊ वर्षीय मुलाचा प्रवरा डाव्या कालव्यात पडल्याने बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली. रितेश संदीप राठोड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्या नजीक महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी उसतोडणीसाठी जळगाव जिल्ह्यातील करगाव येथील ऊस तोडणी मजूर आलेले असून ते या ठिकाणी राहतात.
रविवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास उस तोडणी मजुर संदीप राठोड व त्यांची पत्नी उस तोडणीस गेले असतांना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रितेश संदीप राठोड हा प्रवरा डाव्या कालव्यावर गेला असता तेथे त्याचा पाय,घसरून तो कालव्यात पडला.
या वेळी तेथे असलेल्या तरुणांनी त्याला पडलेले पाहाताच पाण्यात उड्या मारुन त्याला शोधून काढत उपचारासाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
Post a Comment