संगमनेर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या थोरल्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून माहिती दिली असून सायबर पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या थोरल्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात आरोपीने ट्विटरवर फेक (बनावट) अकाउंट तयार केले आहे. या ट्विटर अकाउंट वरील डीपीवर अज्ञात व्यक्तीने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांचा फोटो वापरून थोरात कुटुंबीयांचा फोटो कव्हर फोटो मध्ये वापरला आहे.
या फेक अकाउंट वरून अज्ञात व्यक्तीकडून नियमितपणे ट्विट केले जात होते. हे अकाउंट आ.थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांचे असल्याचे समजून अनेकांनी या ट्विटर अकाउंटला फॉलो देखील केले होते. यात अनेक काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे
या संदर्भात आमदार बाळासाहेब थोरात यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून त्यासंबंधीचे ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वर ट्विट करत आमदार थोरात यांनी म्हटले आहे की माझी कन्या शरयू देशमुख यांच्या नावे सुरू असलेलेे @SharayuDeshmukh हेे ट्विटर अकाउंट फेक आहे.त्या संदर्भात सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
Post a Comment