पोलिस दलातील बदल्यांची प्रतीक्षा संपली....

नगर : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून जिल्ह्याला नव्याने सात पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. तसेच दोन सहायक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून एक सहायक निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत. 


नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांना शिवजयंती बंदोबस्तानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

निरीक्षक कटके यांनी नोव्हेंबर, 2020 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार घेतला होता. गेल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक सराईत गुन्हेगारी टोळीविरूध्द ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. 

दरम्यान त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे तर घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सात पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. यामध्ये जळगाव येथून संतोष भंडारे, संजय ठेंगे, नाशिक ग्रामीण येथून नंदकुमार दुधाळ, देविदास ढुमणे, दशरथ चौधरी, भगवान मथुरे, संतोष मुटकुळे यांचा समावेश आहे.

खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांची जळगाव तर पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक निरीक्षक प्रविण पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. नाशिक ग्रामीण येथून सहायक निरीक्षक राजू लोखंडे जिल्ह्यात बदलून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post