संगमनेर : अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील मूळ रहिवासी असणाऱ्या आणि शिक्षणासाठी संगमनेरात राहत असलेल्या संकेत नवले या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी अखेर पोलिसांनी संगमनेरातील दोघांना गजाआड केले आहे. शाहरुख हसन शेख आणि सलमान इमाम शेख (रा.पुनर्वसन कॉलनी, कुरण रोड संगमनेर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर गती देत या प्रकरणाचा तब्बल दोन महिन्यांनी तपास लावल्याने पोलीस अभिनंदनास पात्र ठरले आहेत.
गतवर्षी ८ डिसेंबर २०२२ रोजी संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्यांचा मृतदेह शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्याच्या बाजूला आढळून आला होता.
संकेत नवले यांच्या शवविच्छेदन अहवालावरून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपींना जेरबंद करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. मात्र घटनेतील आरोपींनी संकेत नवलेचा मोबाईल ही नेल्याने पोलिसांसमोर तपास कार्यात मोठा पेच निर्माण झाला होता.
मात्र पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले आणि त्या माध्यमातून वेगवेगळी माहिती संकलित करताना आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश येत नव्हते. अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक या तपास कामी कार्यरत होते. मयत संकेत नवलेचे फोनवरून नियमित पद्धतीचे संभाषण होत नव्हते,.
तो वेगवेगळ्या संदेश माध्यमांचा वापर करीत असल्याने पोलीस तपासात अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी हार न मानता आपला तपास सुरू ठेवताना अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र उपयोग झाला नाही. मात्र पोलिसांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर गुंतागुंतीच्या असलेल्या या खून प्रकरणी तपास कार्यात यश मिळवले.
नाजुक कारणावरून झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीतून संकेत नवलेचा संगमनेरातील दोघांनी खून करून मृतदेह नाटकी नाल्या जवळ आणून टाकल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी आरोपी शाहरुख हसन शेख (वय २२) आणि सलमान इमाम शेख (वय ३०) दोघेही रा. पुनर्वसन कॉलनी,कुरण रोड संगमनेर या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
७ डिसेंबर २०२२ या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास संकेत सुरेश नवले हा विद्यार्थी नाटकी नाला परिसरात स्वतः गेला होता. तेथे शाहरुख हसन शेख व सलमान इमाम शेख या दोघांशी त्याचा संवाद झाला त्यानंतर आर्थिक देवाण-घेवाणीचा विषय समोर येऊन त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. या दोन आरोपींनी संकेतच्या डोक्यात लोखंडी पाईपचा वार करत त्याला ठार केले.
त्यानंतर दुचाकीवरून त्याचा मृतदेह नेऊन नाटकी नाल्याच्या बाजूला फेकून दिला. या किचकट खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकातील पो.ना अण्णासाहेब दातीर, अमित महाजन, सुभाष बोडखे,प्रमोद गाडेकर, फुरकान शेख आदींनी या तपास कामी कष्ट घेतले.
Post a Comment