नगर: काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आज सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी संगमनेर येत आहेत. सोमवारी दुपारी 4 वा. यशोधन कार्यालय येथे बाळासाहेब थोरात कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात मॉर्निंग वॉक करत असताना तोल जाऊन पडल्याने थोरातांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना नागपूरहून थेट मुंबईला नेण्यात आले. मुंबईत खाजगी रुग्णालयात त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यानच्या काळात ते मुंबईतच रुग्णालयात होते.
तसेच याच दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने तांबे पिता-पुत्र यांच्या बंडखोरी मुळे निवडणूक चर्चेत आली. यात बाळासाहेब थोरात यांनी माध्यमासमोर कोणतेही वक्तव्य न करता त्रयस्थ भूमिका घेत शांत रहाणे पसंत केले. निकाला नंतर मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया देत पक्षांतर्गत झालेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.
आपल्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला. मात्र काल रविवारी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी थोरतांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच नाही असेही स्पष्ट केले.
थोरात आणि पाटील यांनी नाना पटोले यांच्या बाबत वक्तव्य करणे टाळले तसेच रायपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात थोरात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. कसबा, चिंचवड पोटनिवडणूकी साठी थोरतांचे नाव स्टार प्रचारकात आहे. लवकरच ते यानिमित्ताने पुण्यात जाणार आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवर ते काय प्रतिक्रिया संगमनेरमध्ये देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment