अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत घनश्याम शेलार यांचा पराभव झालेला आहे. हा पराभव नसून त्यांचा विजय असल्याचे मत आता कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहे. ही चर्चा आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने सुरु झाली आहे.
अजित पवार हे पाथर्डी दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाषणातून काही गोष्टींचा उल्लेख केला. त्यामुळे आता चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्यात चांगले यश मिळाले होते. मात्र श्रीगोंदे आणि शेवगाव – पाथर्डी मतदार संघात पराभव झाला.यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, श्रीगोंदा येथे राहुल जगताप यांनी सहा महिने आधी मला निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले पाहिजे होतं.
त्यामुळे घनश्याम शेलार यांना पूर्ण तयारी करता आली असती व श्रीगोंदा मतदार संघात आपल्याला विजय मिळाला असता. यावरून आता तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात घनश्याम शेलार यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले. त्यापाठोपाठ अजित पवार जे बोलले त्यावरून आगामी निवडणुकीत शेलार यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आता अण्णांना आमदार करून स्वस्थ बसायचं असा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. मागील निवडणुकीतील चुका आता टाळून सुधारणा करून राजकीय डावपेच टाकू या असे कार्यकर्ते बोलू लागले आहे.
Post a Comment