बाळासाहेब थोरात यांच्यानंतर अनेकांनी सोडली काॅंग्रेस...

नाशिक ः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर आता नाशकात आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे. तांबे कुटुंबियांना पक्षाने दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. 


नाशिकच्या पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून यामध्ये तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआयचे अध्यक्ष ललित मानभाव, सहकार सेलचे अध्यक्ष कुमार भोंडवे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा भोये, महिला शहराध्यक्ष रुख्मिणी गाडर, गीता जाधव, विकास सातपुते, राहुल बिरारी, दिनेश भोये, कैलास गाडर आदींचा समावेश आहे. 

या सामूहिक राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद दिली असून, त्याचा निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. आम्ही केलेली डिजिटल सभासद नोंदणी व बूथ विसर्जित करत असल्याचे म्हटले आहे. या पदाधिकाऱ्यांनी पेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबतही आपला रोष व्यक्त केला आहे. 

त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीने पेठ तालुकाध्यक्ष निवडीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा कोणताही प्रोटोकॉल पाळला नसल्याचाही आरोप केला आहे. पेठ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे पाठविण्यात आले असून, त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही सादर करण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसवर बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहिले असून, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याबाबत घडलेल्या घटनांनी स्थानिक काँग्रेसजन व्यथित झाले आहेत. परंतु, थोरात यांचे वैर थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी असल्यामुळे पटोले यांच्याविरोधात जाण्याचे धाडस या पदाधिकाऱ्यांमध्ये नाही. मात्र, पेठ तालुक्यातील पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही त्याची सुरवात असल्याचे मानले जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post