अहमदनगर ः काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपसले आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते पक्ष बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी तातडीने दखल घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.एच.के. पाटील हे मुंबईत बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचामधील वाद विकोपाला गेला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे. अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पाठवले आहे. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते पक्ष सोडणार असून लवकरच ते एका पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षात ते प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment