संगमनेर ः बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे? यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
तांबे म्हणाले की, काॅंग्रेसमध्ये गट वगैरे असतील असे मला वाटत नाही. मला जे बोलायचे होते ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे. त्यामुळे मला आता काही बोलायचे नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असे तांबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साहेबांची (बाळासाहेब थोरात) माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही. साहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटते. मात्र यावर मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी राजीनाम्याच्या प्रश्नांवर बोलण टाळले आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली आहे. या राजीनामा सत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आता पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादातून एकजण पक्षातून बाहेर पडणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपसले आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते पक्ष बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment