कर्जत : तालुक्यातील कोपर्डी येथे बोरवेल मध्ये पडलेला ऊसतोडणी कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा. चिडीया पुरा, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) याला अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बोरवेल मधून बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने सागर याची प्राणज्य वरती काढण्यापूर्वीच मालवली होती. हे समजतात सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून तो कारखान्यांना पाठवण्यासाठी ऊस तोडणी कामगार काम करत होते. त्यांचे समवेत महिला व लहान मुले देखील होते.
शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतामधील ऊस तोडून कारखान्यांना पाठविण्याचे काम सुरू असताना, शेतामध्ये उघड्या असणाऱ्या बोरवेल मध्ये सागर हा पाच वर्षाचा मुलगा खेळत असताना पडला. यानंतर त्याला वरती काढण्यासाठी प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले.
दोन बाजूने जेसीबीने खोदकाम केले, ऑक्सिजनची व्यवस्था केली. एनडीएफआरचे पाच पथक आले होते. मेराज पठाण यांची खाजगी रुग्णवाहिका व कपिल यादव यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका तात्काळ त्या ठिकाणी पाठवल्या होत्या.
सुमारे पंधरा फूट खोलीच्या अंतरावर छोटा पाच वर्षीय सागर होता. जवळपास आठ तास खोदकाम करून पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने त्यावेळी त्याची प्राणज्योत मालवली होती.
आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांनीही याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व प्रयत्न करून छोट्या सागरचे प्राण वाचवण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. प्रशासनाकडूनही शर्थीचे प्रयत्न केले होते.
Post a Comment