सिल्लोड : राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारे नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यासाठी बँकांनी सक्ती करू नये , असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तसेच सोयगाव तहसीलदार यांनी सर्व राष्ट्रीयीकृत , जिल्हा सहकारी बँक व इतर बँक व्यवस्थापकांची तातडीने बैठक घेऊन याबाबत बँकांना सुचित करावे , अशा सूचनाही सत्तार यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी सांगितल्या अडचणी सत्तार मतदारसंघात दौऱ्यावर असतांना काही शेतकऱ्यांनी सत्तार यांची भेट घेऊन बँक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती करून कर्ज वसुली करत असल्याच्या तक्रारी केल्या.
यावरून सत्तार यांनी विक्रमसिंग राजपूत तहसीलदार सिल्लोड तसेच रमेश जसवंत तहसीलदार सोयगाव यांना तात्काळ सक्तीची वसुली थांबवावी असे आदेश दिले. त्याअनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलेल्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहेत. अशातच जर बँकांनी शेतकऱ्यांचे अनुदान कर्ज खात्यात जमा केले तर हे योग्य होणार नाही.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार यांनी तातडीने बँकांना कोणत्याही शेतकऱ्यांचे अनुदान कर्ज खात्यात जमा करण्याची सक्ती करू नये असे , आदेश दिले आहेत . जर सूचना देवून देखील बँकांनी शेतकऱ्यांचे अनुदान कर्ज खात्यात जमा करण्यासाठी सक्ती केली तर अशा बँकांवर कारवाई करा , असेही सत्तार यांनी बजावले.
अतिवृष्टी व त्यानंतर झालेल्या गारपीट , अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती.

Post a Comment