आम्ही काहीही करू, तुमचं दुखायचं कारण काय ? .... माजी आमदार विजय औटी यांचा खा. डॉ. सुजय विखे यांना टोला....

पारनेर : विधानसभेच्या तीन निवडणूकांमध्ये आ. नीलेश लंके यांनी माझ्या विजयासाठी परीश्रम घेतले. चौथ्या निवडणुकीत पाडून टाकले. तुम्हाला काय अडचण ? आमच्या आमच्यात आम्ही काहीही करू, तुमचं दुखायचं कारण काय ? असा टोला लगावत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर शरसंधान केले. 


महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ सुपा गटातील पळवे खुर्द येथे करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून औटी हे बोलत होते. आमदार नीलेश लंके हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

औटी म्हणाले, महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे ते शहाणपणाचं नाही. संजय राऊत यांच्यासारखी किती माणसं तुरूंगात टाकली ? शेवटी न्यायालयानेच सांगितले की पुरावाच नाही, नंतर त्यांना सोडून द्यावं लागलं. १०० दिवस माणसाला जेलमध्ये सडवलं ना ? जनतेच्या मतावर तयार झालेलं तुमचं सरकार आहे ना ? त्याच पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे आम्हाला येथे येऊन सांगणार असतील तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून फार काही वेगळं घडलं का ? असं काय घडलं ? माझ्या तिनही निवडणूकांमध्ये आ. नीलेश लंके यांनी विजयासाठी परीश्रम घेतले. चौथ्या निवडणूकीत पाडून टाकलं. आमच्या आमच्यात आम्ही काहीही करू, तुमचं दुखायचं कारण काय ?


औटी म्हणाले, राजकारणात कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. कार्यकर्ते विनाकारण एकमेकांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करतात. त्याला खतपाणी घालतात. कोणत्याही राजकीय शक्ती एकत्र आल्या की त्यांना अडचणी निर्माण होतात. कुठेतरी वाचनात आलं की विजय औटी म्हणजेेच शिवसेना आहे का ? या उमेदवारांमध्ये उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखाची पत्नी, मुंबईतील बाळासाहेबांचा हाडाचा शिवसैनिक आहे.

मग मी कशाचा रे बाबा मालक ? मुंबईत शरद पवार बसलेले आहेत. त्यांचा सहकारी म्हणून मी देखील काम केले आहे. त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. ही माणसं जर सभ्यतेने वागतात तर आमच्यावर काही संस्कार आहेत की नाही ? आयुष्यभर आम्ही फक्त भांडायचंच का ? यात जनतेचे हित आहे का ? आपण केलेल्या राजकीय ध्रुवीकरणातून इतरांना उत्तर देणारी ही निवडणूक आहे. 

त्यामुळेच या निवडणूकीस महत्व आहे. पक्षाचा मला आदेश आला. भाजपाशी जुळवून न घेता राष्ट्रवादीसोबत युती करा. कुठेतरी महाराष्ट्राच्या हितासाठी लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या बाबतीत काहीतरी धोरण ठरले असेल ना, त्यामुळेच तालुका पातळीवर आदेश आला असेल असे औटी यांनी स्पष्ट केले. 

आमदार नीलेश लंके म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे आदर्श काम चालले आहे. तालुक्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण व्हावे असे माझ्यासह विजय औटी यांनाही वाटत होते. कुठेतरी थांबूले पाहिजे या भावनेतून शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या या संंस्थेच्या निवडणूकीत एकत्र येण्याचा आम्ही निर्णय घेतला. 

गेल्या पाच वर्षात सभापती प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचा पारदर्शक कारभार केला.या पुढील काळातही बाजार समितीचा नावलौकिक राज्यपातळीवर झाला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील. निवडणूकीनंतर निफाड बाजार समितीला भेट देण्यासाठी सर्व संचालकांना नेण्यात येऊन निफाडच्या धर्तीवर पारनेर बाजार समितीचा लौकिक निर्माण करू अशी ग्वाही लंके यांनी दिली. 

अर्जुन भालेकर, शिवाजी बेलकर, मारूती रेपाळे, डॉ. श्रीकांत पठारे, राजेश शेळके, सुरेश बोऱ्हूडे, बाळासाहेब पोटघन, अमोल यादव, दौलत गांगड, सचिन पठारे, दिपक पवार, सचिन काळे, राहुल झावरे, संदीप चौधरी, सचिन पवार, भाऊसाहेब भोगाडे, संजय तरटे, किसनराव कळमकर, सुभाष लोंढे, सुरेश कळमकर, जयसिंग धोत्रे, संतोष तरटे, प्रसाद तरटे, अंबादास तरटे, बाळासाहेब लंके, आबासाहेब इरकर, वसंत देशमुख, संतोष शेळके, रामभाऊ शेळके, अरूण कळमकर, विनायक पवार, भाऊ जाधव, अमोल शेळके, विठ्ठल पोटघन, रोहिदास नवले, दादाभाऊ शेळके, राजू वाबळे, अनिल करपे, संतोष तरटे, यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरंच, सदस्य, सेवा संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post