चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा व परिसरात सलग चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह अवकाळीने कहर केला आहे. आज झालेल्या तुफानी चक्रीवादळ व पावसाने अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. भर बाजारपेठेतच घराचे पत्रे उडून पडले मात्र सुदैवाने जिवीतहानी टळली.
आज दुपारी साडेचार पाच वाजेदरम्यान अचानक चांदा गाव व गावच्या दक्षिणेकडील परिसरात प्रचंड वादळ आणि तुफानी पाऊस झाला . अवघ्या काही मिनटात होत्याचे नव्हते झाले. प्रचंड वादळी वाऱ्याने गावातील मुख्य बाजारपेठेतील गणीभाई तांबोळी यांच्या घरावरील पत्रे उडून मुख्य बाजारपेठेत येऊन विजेच्या तारांसह पडले. त्याच वेळी या ठिकाणी भाजीपाला विक्रेते बसलेले होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
मात्र पेठेतील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. पत्रे विजेंच्या तारेवरच पडल्याने वीजपुरवठाही खंडीत झाला होता. रात्री वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी होती. गावातील मराठी शाळेजवळ गणपती मंदिर परिसरात बबन जावळे, अशोक लाड, दौलत लाड यांच्या घरावरील पत्र्यांचे शेड संपूर्णच उडाले दोन तीन घरांला ओलांडून ते पत्रे थेट गणपती मंदिराजवळ येऊन पडले.
तेथेही शाळा बंद होती. त्यामुळे मोठी हानी टळली. चांदा बाजार तळावर माजी सरपंच संजय भगत यांच्या दुकानासमोरील मोठे झाड भगत व जमधडे यांच्या दुकानावर पडले आहे. चांदा लोहारवाडी रोडवर चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरात सादिक शेख यांच्या शेडवर झाड पडल्याने त्याच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या भागात या दरम्यान अनेक ठिकाणी वाडी वस्तीवरही मोठे नुकसान झाले आहे. कौठा लोहार वाडी भागातही तुफानी वादळी पाऊसाने कहर केला आहे. चांदा आणि परिसरात आतापर्यंत चार वेळा अवकाळीने प्रचंड नुकसान झाले आहे. आज अनेक शेतकऱ्यांचा काढणी केलेला कांदा भिजला आहे. कांदा काढणी मजूराचेही प्रचंड हाल झाले.
पंचनाम्याचे सोपस्कार चालू असले तरी प्रत्यक्ष नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल बळीराजा करत आहे.




Post a Comment