शेवगाव : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकास एक उमेदवार रिंगणात उतरविल्याने या ठिकाणी सरळ लढत होणार आहे. या व्यतिरिक्त दोन अपक्ष ही आपले नशीब आजमावत आहे. एकूण १८ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. माघारीच्या अखेरीस एकूण २५० उमेदवारांपैकी २१२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या निवडणुकीत आता १८ जागांसाठी एकूण ३८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने नाराज झालेले काहीजण हे बंडखोरीचा पवित्र घेतील, अशी अनेकांच्या मनामध्ये शंका होती. परंतु माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अत्यंत चतुराईने आणि सर्वांना विश्वास देत, भक्कम पॅनेल रिंगणात उतरवल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्यांनी १६ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर तत्कालीन संचालकांपैकी दोघांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे.
भाजपने ही एक चांगला पॅनेल तयार करून तगड्या उमेदवारांना रिंगणात उतरविल्याने हा सामना चांगलाच अटी- तटीचा आणि रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Post a Comment