बाजार समितीचा मलदा दुसरेच खातात : तनपुरे

नगर : बाजार समितीवर प्रशासक असताना मी बाजार समितीत एकदा गेलो होतो. कारभार पाहून चक्रावून गेलो. मनात आणलं असत तर त्या क्षणी संचालक मंडळ जेल मध्ये गेले असते.पण संचालक मंडळ नावाला आहे. 


खरा मलिदा दुसरीकडेच जात आहे हे समजले. विनाकारण इतरांना त्रास नको त्यामुळे शांत राहिलो. कार्यकर्ते मेले तरी चालतील पण स्वतः ची घरे भरली पाहिजेत ही नगर तालुक्यातील या राजकारण्यांची मानसिकता आहे, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके,घनश्याम शेलार, प्रा.शशिकांत गाडे, भगवान फुलसौंदर, उद्धवराव दुसुंगे, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, माधवराव लामखडे, अंकुश शेळके, संपत म्हस्के, प्रताप शेळके, केशव बेरड, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डीले, भाऊसाहेब काळे, प्रवीण कोकाटे, रावसाहेब शेळके, शरद पवार, बाबासाहेब गुंजाळ, रवींद्र भापकर आदी उपस्थित होते.

आमदार तनपुरे म्हणाले की, नगर बाजार समिती जिल्हयात महत्वाची आहे.पण या बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे रक्षण होत नाही, म्हणून अनेक कांदा उत्पादक राहुरी, वांबोरी, घोडेगाव, पारनेर बाजार समितीकडे वळत आहेत.येथील आर्थिक स्थिती दुर्दैवी आहे. आज आमच्या राहुरी बाजार समितीच्या 15 कोटींच्या मुदत ठेवी आहेत. 

नगर बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. नगर तालुक्यात जिरवा जिरवीच राजकारण सुरू आहे. त्रास दिला जात आहे. भाग्यश्री मोकाटे हिला जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. तिचे आयुष्य उध्वस्त केले यांना लाज वाटली पाहिजे. आता अशा राजकारण्यांना शेवटचा ठोका देण्याची वेळ आली आहे. आम्हीं महाविकास आघाडी पॅनल सोबत आहोत.

शशिकांत गाडे  म्हणाले की दादा पाटील शेळके यांनी शेतकऱ्यांनासाठी संस्था उभ्या केल्या त्या संस्था कर्डीले यांनी मोडीत काढल्या. दूध संघाची जागा विकली, बाजार समिती मध्ये मुताऱ्या, शेड, कोंड वाडे ,मोकळ्या जागा विकल्या, गाळे विकून कोट्यवधी रुपये कमावले.जर भ्रष्टाचार केला नसेल तर नार्को टेस्ट साठी तयार व्हा. कर्डीले यांचे व्यवसाय, उत्पन्नाचे साधन काय आहेत ते सांगावे. 

त्यांचे कोठे कोठे बंगले ,फ्लॅट आहेत ते लोकांना सांगा.यांनी घरे फोडण्याचे काम केले .आम्हीं जनावरे छावण्यांसाठी आंदोलन केले यांनी त्यात चारा ,शेण खाऊन भ्रष्टाचार केला.त्यांचे दोन्ही पुतणे महाविकास आघाडी कडे का आले याचे उत्तर त्यांनी द्यावे.कर्डीले यांना आता पुन्हा आमदार होऊ देणार नाही असे सांगतानाच आता आमदार लंके यांच्या मागे ईडी लावण्याची धमकी दिली जात असल्याचेही प्रा.गाडे यावेळी म्हणाले.

बाळासाहेब हराळ यांनी बाजार समिती ला 22 फेब्रुवारी 2022 ते 2023 या 10 महिने प्रशासक काळात 10 कोटी 36 लाखांचे उत्पन्न मिळाले. मात्र पूर्वीच्या सत्ताधारी काळात फक्त 1 कोटींचे उत्पादन मिळाल्याचे दाखवले जात होते.

याचा अर्थ 9 कोटी खाल्ले जात होते. गेल्या 15 वर्षात 70 ते 75 कोटी रुपये खाल्ले असल्याचे ते म्हणाले.तर रघुनाथ झिने यांनी दुधवाल्या आमदाराने शेतकऱ्यांनाचा दूध संघाचे वाटोळे केल्याचा आरोप केला.

नगर बाजार समितीमध्ये परिवर्तन होणार आहे.माझी यंत्रणा सक्रिय असून माझेच अनेक लोक त्यांच्यात जाऊन बसत आहेत. संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला आहे.2022 मधेच माझ्याकडे ईडी येऊन येडी होऊन गेली.काहीच मिळाले नाही.आता काही लोक जिल्हा परिषद ने पूर्वी मंजूर केलेल्या कामाचे उदघाटन करत फिरत आहेत.

सकाळी उठल्यापासून माझ्या नावाचा जप करत आहेत असे खासदार विखे यांचे नाव न घेता म्हणाले.दहशतीवर राजकारण होत नाही.मी जशास तसे उत्तर देणारा राजकारणी आहे.निलेश लंके एवढा सोपा नाही.विरोध सुरू केला तर शेवट करतोच.सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचेही आमदार लंके यावेळी म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post