चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील जानपीरबाबा यात्रोत्सवानिमित्ताने आगळावेगळा कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली असून त्यामध्ये भागवत कथा ज्ञानयज्ञ तसेच निरोगी शरीरासाठी प्राणायाम शिबिराला सुरुवात सुरुवात झाली आहे.
आज गुरुवर्य भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान यांनी आज चांदयात येऊन सुरू असलेल्या भागवत कथाज्ञानयज्ञाला भेट देत सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. श्रीक्षेत्र देवगडदेवस्थानचे महंत हभप भास्करगिरीजी महाराज यांनी काल अचानक जानपीर बाबा देवस्थानला भेट देऊन भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला हजेरी लावली.
काल एकादशीच्या दिवशी महाराजांचे चांद्यात आगमन झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गुरुवर्य महाराजांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी अभिषेक करत पुष्पवृष्टी करण्यात आली. नाना महाराज सुर्यवंशी व अशोक महाराज रासकर यांनी बाबाजींचा सन्मान केला.
चांदा -बऱ्हाणपूर रोडवर जानपीरबाबाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथे मोठी यात्रा भरत असते. मात्र या वर्षी या यात्रेदरम्यान गो-सेवार्थ भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे तसेच प्राणायाम शिबिराचे आयोजन करून भक्तांसाठी नवीन पर्वणी सुरू केली आहे.
भागवत भास्कर हभप नाना महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची यांच्या वाणीतून रोज सायंकाळी सहा ते नऊपर्यंत भागवत कथा पार पडत आहे. त्यामध्ये भागवत महात्म्य, ग्रंथपूर्व पिढीका, नृसिंहलिला, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धणधारक, रुख्मिणी स्वयंवर, सुदामचरित्र, अवधुत संवाद , द्वादश स्कंध अशा रोज विविध धार्मिक विषयावंर भागवत कथा पार पडत आहे.
गुरुवार २० एप्रिलला यात्रेच्या मुख्य दिवशी नाना महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. याच दरम्यान रोज पहाटे पाच ते सहा सर्व भाविकांसाठी विनामुल्य प्राणायाम शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठीही रोज मोठी गर्दी वाढत आहे.
या काळात नेवासा तालुका, तसेच आळंदी देवाची येथील अनेक संत मंडळी भेट देत आहेत. यात्रा दरम्यान आतापर्यंत विविध उपक्रम राबविलेले पाहिले आहे. जानपीर बाबा यात्रेदरम्यान संयोजकांनी धार्मिक तसेच निरोगी शरिरासाठी केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.



Post a Comment