नगर ः निश्चित ठिकाणी बदली न मिळाल्याने, कामात मदत न केल्याने यासह वेगवेगळ्या कारणांमुळे कर्मचारी एकमेकांना त्रास देण्याच्या घटना जिल्हा परिषदेत नित्याच्याच घडलेल्या आहेत. मात्र आता या घटनांमध्ये घट होण्याऐवजी आता वाढ झालेली आहे.
आपल्याला बदली न मिळाल्यामुळे आता त्रयस्तांचा वापर करून एकमेकांना त्रास देण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत सुरु झालेला आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो. हा संघर्ष अनेकदा उघड झालेला आहे. मात्र तो वरिष्ठांनी कार्यालयाात त्यावर तोडगा काढून तो मिटवलेला आहे. त्यामुळे त्याची जास्त चर्चा झालेली नाही.
मात्र आता कर्मचाऱ्यांनी आपल्याला निश्चित ठिकाणी बदली न मिळाल्याने, निश्चित टेबल न मिळाल्याने एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकार सुरु केलेले आहे. काही जणांनी त्रयस्त व्यक्तीची मदत घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरु केलेला आहे.
काहींनी जाणूनबुजून ऐकमेकांची माहिती मागविण्यास सुरवात केलेली आहे. त्यासाठी बाहेरी व्यक्तींचा वापर करून माहिती अधिकारा द्वारे माहिती मागविली जात आहे.
असे माहिती अधिकाराचे अर्ज जिल्हा परिषदेत वाढू लागलेले आहे. या माहिती अधिकाऱ्यांच्या अर्जांचा प्रशासनाने बारकाईने अभ्यास केल्यास त्या मागे कोण आहे, याचा शोध लागण्यास वेळ लागणार नाही.
असे माहिती अधिकारांचे अर्ज पाठवून प्रशासनास वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणतारी मेल्याचे दुःख नाही. पण काळ सोकावला नाही पाहिजे, या म्हणी प्रमाणे प्रशासनाने अशा प्रवृत्तीचे मनोधैर्य वाढण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

Post a Comment