नगर : खासदार डॉ. सुजय विखे व महसूलमंत्री पक्ष विरोधी कामे करीत असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींची पक्ष पातळीवर दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. विखे यांचे पक्ष विरोधी काम सुरु असल्याची टीका भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.
विधानसभा निवडणुकीपासून विखे यांच्यावर ते पक्षविरोधी काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे. विद्यमान आमदार व माजी आमदार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल वरिष्ठांनी घेतली दिसून येत नाही. त्यावर आजी-माजी आमदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत व जामखेड बाजार समिती निवडणुकीतही विखे यांनी पक्ष विरोधी काम केले आहे. श्रीगोंद्यात खासदार विखे व त्यांच्या समर्थकांकडून नेहमीच पक्ष विरोधी काम केले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठांना डावलून इतर पक्षातील नेत्यांना ते जवळ करीत आहेत. इतर पक्षाच्या नेत्यांबरोबर ते सदैव फिरत असून त्यांच्या घरी उठबस करीत असतात.
परिणामी एक निष्ठ भाजपाचे कार्यकर्ते दुरावत चालले आहे. याची वरिष्ठांना माहिती असूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी काही कार्यकर्त्यांनी आता भाजपला सोड चिठ्ठी देऊन इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
काहींनी भाजपात राहून विखे यांच्या विरोधात लढा उभारण्याचा संकल्प केला आहे. या सर्व बाबीत मात्र पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. आगामी काळात पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीतही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. या बैठकीत सर्वांनी पितापुत्रांवरील रोष व्यक्त केला.
Post a Comment