चांदा : राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाबरोबरच समाज बदलासाठी विविध घटकांवर कार्य करत समाज परीर्वतन केले जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठीही त्यांनी मोठे काम केले आहे . त्यामुळेच राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे.
माका येथील मुळा एज्युकेशन सोसायटी राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उदयन गडाख म्हणाले की, शाहू महाराजांनी शिक्षणाप्रमाणेच समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सर्वांसाठी सार्वजनिक पानवठे, मंदिरे खुली करून समाजात एक आदर्श निर्माण केला. म्हणूनच आज शाहू महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे गरजेचे असून जातीभेद नष्ट झाला पाहिजे त्यांनी शिक्षणाला उच्च स्थान देऊन सक्तीचा मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला, असे उदयन गडाख यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माका ग्रामपंचायत व विद्यालयच्या वतीने एसएससी व एचएससी परीक्षा मार्च २०२३या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नेवासा रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्वप्निल ढोणे व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना आनंद वृक्ष देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्रशासन अधिकारी डॉ. अशोकराव तुवर, मुळा सहकारी बॅंकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, माका ग्रामपंचायत सरपंच विजयाताई पटेकर, माका सोसायटीचे चेअरमन डॉ. रघुनाथ पागिरे, व्हा.चेअरमन जबाजी पांढरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिंदे, देडगावचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, माका कॉलेजचे प्राचार्य चोपडे, माजी सरपंच एकनाथ भुजबळ, म. ल. हिव-याचे माजी सरपंच रावसाहेब गायके, सोसायटीचे संचालक मल्हारी आखाडे, रामभाऊ बाचकर, सखाराम शिंदे, अरुण लोंढे, बबनराव भानगुडे, बाबासाहेब लोंढे, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
१२वी कला शाखेत नेवासा तालुक्यात प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.अश्विनी रामभाऊ बाचकर हिचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भक्ती लोंढे, कल्याणी शिंदे, ओम खेडकर, सिद्धी खेडकर, वर्षा आंधळे, वृषाली गायके, कोमल पालवे, ऋतुजा भडके, पुनम लोंढे, स्वाती चांडे, सुमित पटेकर या गुणवंतांचा देखील सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथम शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित दिंडी काढण्यात आली, यामध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेला विद्यार्थी व त्यांचे मावळे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते, प्राचार्य दिलीपराव सोनवणे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Post a Comment