रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा झोल...

नगर : जिल्हा नियोजन मंडळातून मिळालेल्या निधीतून नगर जिल्हा परिषदेमार्फत लेखाशिर्ष 3054 अंतर्गत काढलेल्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा झोल करण्यात आला आहे. त्यामुळे सदरची निविदा प्रक्रियाच त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या निवेदनाची दखलच घेतली गेलेली नसल्यामुळे आम् आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु झाले आहे. 


या उपोषणात राजू आघाव, प्रवीण तिरोडकर, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, दिलीप घुले, प्रा.अशोक डोंगरे, संपतराव मोरे, प्रकाश फराटे, आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

आम आदमी पार्टीचे प्रविण तिरोडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षांत जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिलेल्या लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत कामांची निविदा प्रक्रिया सदोष असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. 

ठेकेदारांच्या स्पर्धात्मक चढाओढीतून शासनाचा कमीतकमी निधी खर्च होऊन विकास कामेही दर्जेदार तसेच दिर्घकाळ लोकोपयोगी ठरण्याच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेली सदर निविदा प्रक्रिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियम डावलून राबविण्यात आल्याचा आरोप आहे. 

या सदोष निविदा प्रक्रियेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांच्या माध्यमातून शासनाच्या निधीची उधळपट्टी होऊनही संबंधित ठेकेदारांच्या सक्षमतेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीतही शंका निर्माण झाली आहे.

या लेखाशीर्षातून नेवासा तालुक्यात मंजूर कामांच्या टेंडर प्रक्रियेचे उदाहरण घेतल्यास ज्या ठेकेदारांनी १२ टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा भरलेली असताना त्यांची नामंजूर करुन ज्या ठेकेदारांनी अवघ्या ५ ते ६ टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यांच्या मंजूर करण्यात आल्याचे अव्यवहार्य तसेच शासकीय निधीचे नुकसान करणारे विरोधाभासात्मक चित्र दिसून आले आहे. 

अपात्र ठरलेल्या ठेकेदारांना त्यांच्या निविदा नामंजूर करण्यामागे अत्यंत तकलादू, पोरकट तसेच हास्यास्पद कारणे दिली असल्याचे दिसून येते. टेंडर भरतेवेळी मागील वर्षी त्यांच्या नावावर असलेले काम पूर्ण झाले नाही, डिजिटल स्वाक्षरी नाही, दिलेली कागदपत्रे क्रमवारीत नाहीत, यांत्रिकी व डांबर प्लॅटचे करार योग्य नाही.

यांत्रिकी विभागाचे प्रमाणपत्र वैध नाही, अनुक्रमांक बरोबर नाही, M.OR.T. &H प्रमाणपत्र जोडले नाही, अशी अत्यंत तकलादू कारणे देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्या निविदा दद्द करण्यात आलेल्या आहेत त्यातील निरंजन देशमुख या ठेकेदाराने दिलेले मशिनरीचे अॅग्रीमेंट जुने असल्याचे दिसून येते. त्यांच्या कामाची साईट ते प्लॅटपर्यंतचे अंतर ६० कि.मी.च्या आत असणे गरजेचे असताना प्रत्यक्षात ते त्यापेक्षा जास्त असतानाही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करुन निविदा मंजूर केल्याचे दिसून आले आहे. 

ड्रममिक्स प्लॅटच्या M.OR.T. &H सर्टिफिकेटच्या पेपरमध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाच ट्रॅक्टर व जेसीबीचा करारनामा संपल्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यातील विशेष गंभीर बाब म्हणजे ज्यांना साईट इंजिनिअर म्हणून नियुक्त केल्याचे दाखवले गेले आहे. त्यांच्या अनुभवाचे सर्टिफिकेट सपशेल चुकीचे दाखवले गेल्याचे दिसून आले आहे. 

सदरची निविदा प्रक्रियेला स्थगिती देऊन सखोल चौकशी करावी. तसेच ही प्रक्रिया रद्द करुन नव्याने दोषमुक्त तसेच निकोप स्पर्धात्मक वातावरणात नव्याने कार्यान्वीत करण्याची मागणी करत आहोत. 

यासंदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात दाद मागणार आहोत. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, गैरव्यवहार झालेला असल्याचा संशय घेण्याइतपत स्पष्ट परिस्थिती असल्याने याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तसेच लाचलुचपत विभागाकडेही पुरेशा पुराव्यांसह तक्रार करण्याबरोबरच सदर निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post