चांदा : पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आस उराशी ठेवून नेवासा तालुक्यातील चांदा येथील वैकुंठवासी श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज चांदा ते पंढरपूर दिंडीचे भक्तीमय वातावरणात आज चांदा येथून प्रस्थान झाले. दिंडीच्या स्वागतासाठी 51 तोफांची सलामी देण्यात आली.
शेतातील खरिपाची कामे आटोपून बळीराजा आषाढी वारीसाठी सज्ज झाला. मात्र यंदा पावसाळा सुरू होऊनही दोन्ही नक्षत्र कोरडेच गेल्याने खरिपाच्या पिकाची काळजी लागलेला बळीराजा सर्व चिंता पांडुरंगाच्या चरणी वाहत आता पंढरीच्या वाटेवर निघाला आहे.
आज सकाळी आठ वाजता मुख्य बाजारपेठेतील प्रभू श्रीरामचंद्र मंदिरात हरिभक्त परायण पंडित महाराज भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारकरी एकत्र आले. त्या ठिकाणी विठुरायाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दिंडीला सुरुवात झाली.
टाळ मृदुंगाचा स्वर ,ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष ,भगव्या पताका खांद्यावर घेत निघालेले वारकरी, तुळस डोक्यावर घेऊन नामजपत तल्लीन झालेल्या महिला वारकरी, आणि डीजे वर चालणारा पंढरीशी जारे आल्यानो संसारा यासारखे वारकऱ्यांचे भजनाचा सुमधुर स्वर अशा थाटामाटात लोहिया महाराज दिंडी ला सुरुवात झाली.
ग्रामस्थांच्या वतीने 51 तोफांची सलामी दिंडीच्या स्वागतासाठी देण्यात आली. यंदा दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली असल्याने दिंडी व्यवस्थापन समितीनेही अगदी सुरुवातीपासूनच चोख व्यवस्था केली आहे . चांदा बाजारपेठेपासून पंचवटी पर्यंत ठिकाणी दिंडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य किट संचाचे वाटप यावेळी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ सुधीर पुंड,रजनिकांत पुंड यांनी केले.
सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी चांदा येथे येऊन दिंडीच्या रथाची तसेच वै ह भ प श्रीकृष्णणदासजी लोहिया महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आशीर्वाद घेतला.
महाराष्ट्रातील धार्मिक विचाराची परंपरा पुढे नेण्याचं काम वारकरी संप्रदाय करत असून वारकरी संप्रदायाची दिंडी हे एकात्मतेचे प्रतीक आहे .मी सुध्दा वारकरी आहे .पायी दिडी सोहळा म्हणजे भुतलावरील स्वर्गसुख आहे.
वारकऱ्यांना पंढरपूर मार्गात पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल असे प्रतिपादन सपोनी माणिक चौधरी यांनी केले.
Post a Comment