चांदा परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन


चांदा : बुद्धीची देवता, आद्य देवता श्री गणेशाचे नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी आज थाटात आगमन झाले. दुष्काळाची छाया हटू दे ! भरपूर पाऊस पडू दे ! अशी विनवणी करत आज गणेश भक्तांनी श्रीगणेशाची स्थापना केली आहे.


श्रीगणेशउत्सवाला भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घरी आणण्यासाठी गणेश मूर्तीस्टॉलवर प्रचंड गर्दी केली होती. पावसाने ओढ दिलेली असल्याने गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट राहील असे वाटत होते. 

मात्र आद्यगणेशाला वंदन करण्यासाठी आज चांदा आणि परिसर सकाळपासूनच मोठ्या उत्साह व भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी सज्ज झालेला दिसत होता. 

लालबागचा राजा ,दगडूशेठ हलवाई अशा विविध प्रकारच्या मूर्तींनी चांदा बाजारतळावरील गणेश स्टॉल सजले होते . सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीची दुकानेही मोठ्या प्रमाणावर गजबजलेली होती. 

कालपासूनच गणेश मूर्तींचे स्टॉल चांदा बाजारतळ चौकात लागलेले होते. विविध सार्वजनिक मंडळांनीही ठिकठिकाणी श्रीगणेश उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले असून गणपती स्थापना सायंकाळपर्यंत त्या त्या ठिकाणी सुरू होती. 

गावातील श्रीलक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने श्रीगणेश मंदिरात सकाळीच गंगेवरून आणलेल्या पवित्र कावडीने जलाभिषेक करत श्रीगणेशोत्सवाला सुरुवात केली .

श्रीगणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक मंडळातून करण्यात आलेले आहे. चांदा आणि परिसरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि उल्हासाचे भक्तिमय वातावरण दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post