नगर : विखे साखर कारखान्याबरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व आर्थिक बाबी व कर्जव्यवहार यांची पुनर्तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विखे कारखाना आर्थिक दिवाळखोरीच्या परिस्थितीत आहे. याची बँकेने नोंद घेणे आवश्यक आहे. अशी लेखी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना अरुण कडू, एकनाथ चंद्रभान पा. घोगरे, बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
नगर जिल्ह्यातील व आशियाई खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सहकारी साखर कारखाना असून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली या कारखान्याची वाटचाल सध्या सुरू आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये कडू यांनी म्हणले आहे की, विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या कारखान्याच्या सन 2021/22 च्या आर्थिक पत्रकांमध्ये बेकायदेशीरपणे 31 मार्च 2021 अखेरच्या रकमा फेरबदल करून बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक अनियमितता केल्याने आपले जिल्हा सहकारी बँकेची झालेली फसवणूक व त्यामुळे सदर विखे कारखान्यास कर्जपुरवठा बंद करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
या कारखान्याने त्यांचे अधिकृत वार्षिक अहवाल व ताळेबंदात सन 2021 / 22 चे आर्थिक पत्रकांमध्ये बेकायदेशीरपणे दि. 31 मार्च 2021 अखेरच्या रकमा फेरबदल करून व बनावट कागदपत्रे तयार करून गंभीर आर्थिक अनियमितता केली आहे.
सदर विखे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन 2020/21 चा आर्थिक अहवाल वार्षीक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला आहे. त्या अहवालानुसार सन 2020/21 च्या ताळेबंदात पान नं. 13 मध्ये कारखान्याचा तोटा 170,19,06, 327.74 इतका दर्शविला आहे. परंतु
पुढील सन 2021/22 च्या वार्षिक अहवाल व नफा तोटा पत्रकामध्ये मागील सन 2020/21 मधील वरील उल्लेखित 170,19,06,327.74 हा तोटा निरंक दाखविण्यात आला.
सन 2020 / 21 व सन 2021/22 या दोनही वार्षिक अहवालात फेरफार करून व बनावट कागदपत्रे तयार करून उल्लेखिलेल्या 170 कोटींचा तोटा निरंक दाखविला आहे. तसेच सन 21 मार्च 2021 आर्थिक पत्रकाप्रमाणे पान नं. 16 मध्ये संचित नफा निरंक दाखविला आहे.
परंतु बनावट कागदपत्रे तयार करून दि. 21/03/2022 च्या आर्थिक पत्रकाप्रमाणे आरंभी रक्कम पान नं. 16 व संचित नफा रु.21,43,85,652.18 बनावट दर्शविला आहे. कडू यांनी म्हटले आहे.
Post a Comment