नगर ः शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र व शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. नवरात्रीत नऊ रंगांना जसे महत्व आहे. तसेच प्रत्येकाच्या जीवनात सफेद रंगाला महत्व आहे.कोरोना काळात संपूर्ण जग थांबलेले असताना पांढऱ्या कपड्यातील व खाकी कपड्यातील व्यक्तींचे कामकाज सुरु होते. बाकी सर्वच थांबलेले होते. या सफेद रंगातील व्यक्तींनीच अनेकांना जीवदान दिलेले आहे.
कोरोना काळात या सफेद रंगातील व्यक्तींचा सर्वांनीच सन्मान केलेला आहे. मात्र आता सर्वांनाच विसर पडलेला आहे. 24 बाय सात असे कामकाज सफेद रंगातील वैद्यकीय क्षेत्राचे कामकाज सुरु आहे. या सफेद रंगातील परिचारिका, डाॅक्टर या सर्वांचाच नवत्रोत्सवात सन्मान होणे गरजेचे आहे. यामध्ये आरोग्यसेविकांचा सर्वात प्रथम सन्मान होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
डाॅक्टर जरी औषधौपचार करीत असले तरी या आरोग्यसेविकांच्या सेवेमुळेच असाध्य आजारातून रुग्ण बरे होत असतात. या नारीशक्तीचा नवरात्रोत्सवात प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळासह देवी मंदिरांनी सन्मान करणे गरजेचे आहे. सफेद रंग नेहमी कामात दंग असे स्लोगन तयार केले असून आरोग्य सेवेतील प्रत्येकजण समाज माध्यमावर फोटो ठेवत आहेत.
आरोग्य विभागात तब्बल 60 टक्के पदे रिक्त आहेत. असे असतानाही सरकारी उद्दिष्ट आरोग्य सेविकांकडून १०० पूर्ण करून घेतले जात आहे. मात्र त्यांच्यावरील कामाचा ताण कमी केला जात नाही. अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरली जात नाही. नव्याने रिक्त पदांची भर पडत असून कामाचा ताण वाढत चालला आहे.
आरोग्य सेवेचे व्रत घेतलेल्यांचे मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. आरोग्यसेवेसाठी 24 तास सेवेत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ खराब होत आहे. त्यामुळ त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे असून नोकर भरती करून सर्वांनाच आरोग्याच्या उत्कृष्ट सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नवरात्रोत्सव काळात संकल्प होणे गरजेचे आहे.
Post a Comment