बारामती ः आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही लढती चुरशीच्या होणार आहे. आतापासून काही लोकसभा मतदारसंघातील लढती कोणाविरुध्द कोण उभे राहून होणार आहे, या विषयी चर्चा सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणूक पवार कुटुंबियात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही नणंद-भावजयमधील निवडणूक कोण लढविणार यावर सध्या चर्चा सुरु आहेत. या लढतीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा पवार या बारामतीतून त्यांची नणंद आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याविरोधात कोणीतरी निवडणूक लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. लोकशाहीत भारतीय जनता पक्ष माझ्याविरोधात एक नाही तर तीन वेळा निवडणूक लढला आहे. त्याच्या गैर काय आहे? कोणीतरी लढलंच पाहिजे. जो कोणी लढेल त्याचं मी स्वागत करेन.
कारण माझं संविधानावर प्रेम आहे. माझं राजकारण आणि समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं पोस्टर लावण्यात काहीच गैर नाही. एखाद्या कार्यकर्त्याची तशी इच्छा असेल, म्हणून त्याने ते पोस्टर लावलं असेल. आपण त्याचं स्वागत केले पाहिजे.
सुप्रिया सुळे यांनी आगामी संभाव्य लढतीवर प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु अजित पवार गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नणंद-भावजय यांच्या लढत होऊ नये, असे दोन्ही गटाकडून बोलले जात आहे. मात्र ही लढत व्हावी, अशी अपेक्षा विरोधकांची असून ते या विषयाला खतपाणी घालत आहेत.
Post a Comment