पाथर्डी ः मला पक्षाने २०१९ मध्ये लोकसभेची उमेवारी दिली नव्हती. मात्र मी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले.
श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर आमदार राम शिंदे त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी सह पत्नीत देवीची पूजा करून आरती केली. यावेळी आमदार नीलेश लंके, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते.
आ. शिंदे व आ. लंके यांचे देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे, अनुराधा केदार, डॉ.ज्योती देशमुख, पोपट फुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भिमराव खाडे यांनी स्वागत करून सन्मान केला.
आमदार शिंदे म्हणाले लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून मी माझ्या इच्छेवर ठाम आहे.२०१४ मध्ये पक्षाने तिकीट दिले नाही.२०१९ ला मी घेतले नाही. मात्र आता २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी तयार आहे. यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. भाजपामध्येच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक प्रतिस्पर्धी निवडणुक लढवण्यास तयार आहे. हे शिंदे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.
आमदार लंके म्हणाले, आमदार शिंदे हे पालकमंत्री असताना मला त्यांनी राजकीय जीवनात पक्षाचा विचार न करता फार मदत केली. त्यांच्याविषयी माझ्या मनात वेगळी आस्था आहे. त्यामुळे मी त्यांची गाडी चालवायला बसलो याचा मला आनंद आहे. मागच्या कालखंडात आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या मत प्रवाहात होतो, तरी पण आम्ही पक्ष बंधने सांभाळून प्रेम जपले आहे.
आता आम्ही महायुतीत आल्याने आम्ही एकत्र आलोय एवढेच या निमित्ताने संकेत आहे.कोणाला काय समजायचं तो ज्याचा त्याचा विषय आहे.मोहटादेवीचं आम्हाला एकत्र बोलावणं आलं म्हणून आम्ही एकत्रित देवीचे दर्शनाला आलो, हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे, असे ते म्हणाले.
Post a Comment