राहुरी : सहा महिन्यांचे थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कट केले. नंतर वीज बिल भरल्याने वीज कनेक्शन पुन्हा जोडून दिले; परंतु लाइट चालू झाली नाही. त्यामुळे वीज ग्राहकाने महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली.
माधव अमृता हिलीम (वय ३१, रा. देवळाली प्रवरा) हे महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर नोकरीस आहेत. राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथील गयाबाई शाहाराम शिंदे यांचे वीज कनेक्शन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत होते.
११ मार्च रोजी सकाळी माधव हिलीम यांनी इतर कर्मचारी सोबत घेऊन शिंदे यांचे वीज कनेक्शन कट केले. दुपारी शिंदे यांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आले.
सायंकाळपर्यंत शिंदे यांची लाइट चालू झाली नाही. शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून आम्ही वीज बिल भरूनदेखील लाइट आली नसल्याचे सांगितले.
माधव हिलीम, सचिन बोडखे, भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले. तेव्हा गायबाई शिंदे यांचा पती शाहाराम नामदेव शिंदे हा तेथे उभा होता. त्याने माधव हिलीम यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
Post a Comment