मुंबई : महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोणाला कोणत्या जागा मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच शिंदे गटाने लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाच्या पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचंय, दुस-या कोणाचं नाव नसल्याचं श्रीकांत शिंदेनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहेत. त्यात गोडसेसुद्धा असतील असे विधान श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. आता भाजप व राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडेच सगळ्यांचे लक्ष लागल आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देणार अशी सूत्रांची माहिती आहे. उत्तर मुंबई मतदार संघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे दोन टर्म खासदार आहेत. मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाणार असं बोललं जाते.
त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांचे नाव भाजपकडून आघाडीवर आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
भाजप नेते सुधीर मुनंगटीवार आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, संदीपान भुमरेंना संभाजीनगरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुनगंटीवार, भुमरे लोकसभा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुधीर मुनगंटीवारांनी मात्र दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.
Post a Comment