नगर : मराठा तरुणांनी केंद्रीय लघु व सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांना काळे झेंडे दाखविले. दरम्यान, सहा मराठा तरुणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय लघु व सूक्ष्म मंत्री नारायण राणे शुक्रवारी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते अकोळनेर येथील कॉमन फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यांचे दुपारी पोलिस मुख्यालयात आगमन झाले. तिथेही त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला.
तत्पूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राणे यांचा ताफा पोलिस मुख्यालयातून निघून पत्रकार चौक, डीएसपी चौक मार्गे पुणे रोडने कायनेटिक चौकाकडे निघाला. हा ताफा पुणे रोडने कायनेटिक चौकाच्या दिशेने जात असताना अचानक शिल्पा गार्डनसमोरून काही तरुण हातात काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले.
त्यांनी एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत राणे यांच्या वाहनासमोर जाऊन काळे झेंडे दाखविले. दरम्यान, आंदोलनातील सहा जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment