जो आवडे सर्वांना ।
तोचि आवडे देवाला।।
याप्रमाणेच सर्वानाच अत्यंत प्रिय असणारे श्री. सुभाष बापुराव दळवी देवालाही प्रिय झाले अन् ते सर्वांच्याच हृदयाला धक्का लावून अकाली रविवार दि.१६ मार्च २०२४ ला अपघात झालेने दुपारी देवाघरी गेले. नावाप्रमाणेच ते सर्वांशी सु-भाष्य करीत असत.
तिखी ता. कर्जत या गावचे सुपुत्र असलेले बालवय असतांना म्हणजे इयत्ता ८ वीत शिकत असतांना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले अन् वडीलांच्या जागेवर ते अनुकंपा तत्वावर कनिष्ठ सहाय्यक या पदावर जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये रुजू झाले. मुळातच हुशार असलेने त्यांनी स्पर्धा परिक्षा दिली अन् वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नत झाले. पुन्हा पदोन्नती मिळाली अन कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर येथे हजर झाले.
ग्रामपंचायत विभागामधील खाते प्रमुखानंतर महत्वाच्या पदावर आपण आहोत असा स्पर्शही त्यांच्या हृदयाला झाला नाही. मला आठवत ते स्वतः माझ्या खुर्चीजवळ आले, बसले. आमचा पूर्वीचाच परिचय असलेने आपुलकीने विचारपूस सुरु झाली. खर तर त्या दिवशी ते माझ्याजवळ आले आणि माझ हृदय जिंकून घेऊन गेले कारण ते देवाघरी गेल्यापासून आता या क्षणालाही त्यांचीच हसरी प्रतिमा माझ्या हृदयात, माझ्या डोळयात सारखी उभी आहे. जशी माझी अवस्था तशीच अगदी माझ्या विभागातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वर्ग ४ पासून वर्ग १ पदांपर्यतच्या कर्मचारी अधिकारी यांची झालेली आहे.
प्रत्येकजण भेटतो, बोलतो तेव्हा हेच जाणवते. ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी आणि अधिकारी अक्षरशः धाय मोकलून रडले. माझ्या ऑफिसमधील महिला कर्मचारी भगिनींना सुभाषजींचा मोठ्या भावासारखा आधार वाटे. ते प्रशासनातील दुवा होते. नव्हे नव्हे ते सर्वांचाच आधारस्तंभ होते. कामकाज करुन घेण्याचा त्यांचा हातखंडा होता. सर्वांशी निरहंकारी वृत्तीने, प्रेमाणे वागत असत. प्रत्येकाशी स्वतः हुन बोलणे, आपुलकीने विचारपुस करणे, सतत हसत राहणे, विनोदाने चेष्टा करणे हा त्यांचा स्वभाव .
एक मुलगी, एक मुलगा, गोड स्वभावाची सहचारीणी आणि आई असे त्यांचे कुटुंब. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे" या उक्तीला अनुसरुन मातोश्रीची ते फार काळजी घेत असायचे. आई जवळ रहावी असे त्यांना नेहमी वाटे, परंतू आईला शहरात करमत नसल्याने भेटण्यासाठी सुट्टीत गावी जात. गावाचा त्यांना फार लळा आणि अभिमान होता.
गावात गेले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वाशी आपुलकीने बोलायचे. नाते संबंधातही तसेच, अडिअडचणीच्या काळात सर्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, स्वतः मदत करत. धर्मकार्यातही दानरुपाने नेहमी सहभाग घ्यायचे. गाव, नातेवाईक, मित्रमंडळ आणि कुटुंब वत्सल स्वभावाचे आणि फारच श्रीमंत हृदयाचे होते सुभाषजी. त्यांच्या जाण्याने सर्वांचाच आधार हरपला आहे.
कामाचा प्रचंड उरक, हुशारी अन् अनुभवाच्या जोरावर त्यांनी ग्रामपंचायत विभागाची मान शानाने उंचावली. जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिषजी येरेकर सरांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित असतांना दळवी साहेबांचे नाव घेऊन केला. खर तर जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावर असणारे सर्वोच्च प्रमुख एका कनिष्ठ पदावर काम करणा-या सुभाषजी सारख्यांचे नाव घेतात हीच तर त्यांच्या कामाची खरी पावती आहे, हेच तर खरे बक्षिस आहे, आणि हाथ सर्वोच्च सन्मान आहे.
सुभाषजींनीही सरांचा शब्द शेवटपर्यंत खरा करुन दाखवला. याच सभागृहामध्ये शोकसभा सोमवारी संपत्र झाली तेव्हा सुभाषजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अधिकारी कर्मचारी सभागृहात आले तेव्हा अक्षरशः ब-याच कर्मचा-यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही तेव्हा ते तिथेच जागेवर उभे राहिले, आपल्या मनातील भाव त्या ठिकाणी समर्पित केला. उपमुख्य कार्यकारी पदावर कार्यरत असलेले मा.दादाभाऊ गुंजाळ, मा. राहुलजी शेळके, मा.समर्थ शेवाळे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दुखांने भरलेल्या हृदयांने भावपूर्ण शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान येरेकर सर जेव्हा शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले तेव्हा दोन चार वाक्यानंतर त्यांना तर बोलताच येईना इतका त्यांचा कंठ दाटून आला. पाणी पिण्यासाठी मागीतले, पाणी पिले, आवंढा गिळला तेव्हा बोलणे सुरु झाले. इतकं प्रेम सुभाषजींनी सर्वांचं मिळवलं. पूर्वी सभागृहात सुभाषजींचे कोतुक केले होते त्यापेक्षा अधिक कौतुक सरांनी केले. त्यावेळी माझ्या मनात भाव जागृत झाला की सुभाषजीनी खरच जायला नको होते, कारण या शोकसभे ऐवजी त्यांच्या कार्याच्या सन्मानाची सभा लवकरच संपत्र झाली असती इतक्या उंचीचे त्यांचे कार्य चालू होते. परंतू त्यांच्याकडून नियतीलाच कदाचित याहीपेक्षा मोठे कार्य करुन घ्यायचे असेल.
सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन शेवटी ईश्वराला एकच प्रार्थना करतो की जशी सुभाषभाऊंनी आम्हा सर्वांना प्रेम दिले, आधार दिला, साथ दिली, आम्हाला ते आमचे वाटले तसे हे ईश्वरा सुभाषभाऊंना तुझ्या दरबारात तुझ्याजवळ घेऊन त्यांना सद्गती दे आणि त्यांच्या कुटुंबाला या संकटातून सावरण्याचे बळ दे.
ॐ शांती। ॐ शांती ।। ॐ शांती ।।।
- संजय लक्ष्मण नेव्हल, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अहमदनगर
Post a Comment