पारनेर ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपलेली आहे. आता फक्त निकालाची सर्वांना अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरमधून महायुतीकडून उमेदवार कोण राहिल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महायुतीत अनेक इच्छुकांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिकांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता महायुतीकडून उमेदवार कोण राहणार हा प्रश्न आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असूनही ऐन वेळी माजी आमदार विजय औटी यांनी खासदार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झालेली आहे. मात्र त्यांनी आपली भूमिका बदलेली नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा विखे यांनाच दिलेला आहे. त्यामुळे त्यांना आगामी काळात महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तेही आगामी निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी विखे यांना ऐनवेळी मदत केल्याने त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सुजित झावरे यांनी विखे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. सध्या झावरे हे अजित पवार गटात असून ते आगामी विधान निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. झावरे यांनी लंके यांना साथ देण्याऐवजी त्यांनी विखे यांना साथ दिलेली आहे. सर्वच ठिकाणी त्यांनी प्रचार केलेला आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी आपण विखे यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून झावरे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत झावरे यांनी चांगले काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत विखे यांची साथ नक्कीच राहणार आहे.
शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते माजी सभापती काशिनाथ दाते यांनी लोकसभा निवडणुकीत विखे यांच्याबरोबरीने काम केले आहे. तालुक्यातून विखे यांना मताधिक्य मिळावे, यासाठी काशिनाथ दाते यांनी भरघोस काम केलेले आहे. या कामाच्या बदल्यात आता विखे त्यांना आगामी निवडणुकीत कशी साथ देतात, हे पहाणे महत्वाचे राहणार आहे. दाते यांनीही आमदार व्हावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. लोकसभा निवडणुकीत कोणताही की परंतु न ठेवता दाते यांनी तनमनाने काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी विखे यांना प्रयत्न निश्चतच करावे लागतील, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे.
पारनेर बाजार समितीचे माजी सभापती तथा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे सध्या अजित पवार गटात आहेत. गायकवाड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उभे रहावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी पक्षासाठी अऩेक कामे केलेली आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप महत्वाची भूमिका निभावली आहे.त्यामुळे जर गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली तर विखे यांना गायकवाड यांना मदत करावी लागणार आहे.
महायुतीकडून यासह काही नेतेही इच्छूक आहेत. त्यामुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील जागा नेमकी कोणाकडे जाणार याविषयी सध्या फक्त चर्चा सुरु आहे. परंतु ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Post a Comment