नगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये उभी फूट पडली आहे. ऐनवेळी बापूसाहेब तांबे यांच्या सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या १२ संचालकांनी विरोधकांच्या मदतीने स्वतंत्र होण्याची भूमिका घेतली.
श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सालके यांची अध्यक्षपदी, तर शेवगावचे संचालक रमेश गोरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
दोन वर्षांपूर्वी शिक्षक बँकेची निवडणूक होऊन बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळाने सर्व २० जागा जिंकत बँकेवर एकहाती वर्चस्व मिळवले. संचालक मंडळात आलटून-पालटून पदाधिकाऱ्यांच्या निवडी दरवर्षी केल्या जात होत्या.
गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये नेवाशाचे रामेश्वर चोपडे यांची अध्यक्षपदी, तर निर्गुणा बांगर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मंडळाच्या निर्णयानुसार चोपडे व बांगर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मंगळवारी बँक सभागृहात संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती.
उपनिबंधक शुभांगी गोडे या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. ठरल्याप्रमाणे रोटेशन निवडी असल्याने त्या बिनविरोध होतील, अशीच शक्यता होती. त्यामुळे गुरुमाऊली मंडळाने अध्यक्षपदासाठी पारनेरचे संचालक कारभारी बाबर यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला.
मात्र, ऐनवेळी संचालक बाळासाहेब सरोदे यांनी त्यास आक्षेप घेत अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तासभर आधी झालेल्या बैठकीत सोबत असणाऱ्या काही संचालकांनी वेगळी भूमिका घेतल्याने तांबे गटाचा पराभव झाला. पारनेर व इतर तालुक्याच्या वादात ही फूट पडली.
बँकेत ज्या प्रकारे सत्ता बदल झालाय तसाच बदल विकास मंडळात होईल अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे शिक्षकातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.
विरोधकांनी काही संचालकांची बैठक घेतली आहे. या बैठकीत विकास मंडळाचा एक गट बाहेर पडेल अशी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी गटातील मोठ्याने त्याने संचालकांना मार्गदर्शन केले आहे.
.jpeg)
Post a Comment