चांदा : पंढरीच्या विठुरायाला भेटीसाठी जाणारा पायी दिंडी सोहळा हा या भूतलावरील सर्वोच्च सोहळा आहे .मानवी जन्मात प्रत्येकाने या सोहळ्यात एकदा तरी सहभाग घेऊन आपले जीवन धन्य करावे . या सोहळ्यात सामाजिक एकोपा साधला जातो .जातीभेदाच्या पलीकडे असलेला हा सोहळा त्यामुळेच जगातील सर्वोच्च सोहळा मानला गेला आहे. असे प्रतिपादन सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी केले आहे.
येथील वै. गू .ह भ .प .श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज चांदा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चांदा येथून मार्गस्थ होत असताना या दिंडीचे पूजन करताना सोने पोलीस स्टेशनचे सपोनी आशिष शेळके बोलत होते. आज सकाळी आठ वाजता मुख्य बाजारपेठेतील प्रभू श्रीरामचद्रांच्या मंदिरात ह भ प पंडित महाराज भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदा आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी एकत्र जमले.
त्या ठिकाणी विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडी मुख्य ७बाजारपेठेतून मार्गस्थ झाली. पुढे डीजे च्या तालात विठुरायाची भजन, पाठीमागे टाळ मृदुंगाचा गजर करीत विठू माऊलीचा भजनाचा निनाद आणि सहभागी झालेले शेकडो वारकरी अशी भव्य दिव्य दिंडी सोहळा सुरू झाला .या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहिले.
या सोहळ्यासाठी 51 तोफांची सलामी देण्यात आली. ठिकठिकाणी दिंडीचे भव्य स्वागत करून हभप पंडित महाराज भुतेकर यांचे पूजन करण्यात आले. यावर्षी नव्याने लोकवर्गणीतून बनवलेल्या रथाचे पूजन गावातील मारुती मंदिराजवळ सपोनी आशिष शेळके, रामायणाचार्य हभप देविदास महाराज आडभाई, ह भ प पंडित महाराज भुतेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावर्षी वरूण राजाने लवकर कृपा केल्याने बळीराजा पेरणी ,निंदणी, खत ,खुरपणी करून वारीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे यंदा वारीमध्ये वारकऱ्यांचा सहभाग दरवर्षीपेक्षा जास्त दिसून आला.
वारीचे यंदाचे हे 24 वे वर्षे असून श्रीक्षेत्र देवगड येथील गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शिस्तप्रिय दिंडीप्रमाणेच चांदा येथील वै . ह भ प श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज चांदा ते पंढरपूर दिंडी सोहळा हा शिस्तप्रिय दिंडी सोहळा म्हणून लौकिकास पावला आहे.
गावात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करत दिंडीतील वारकऱ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. चांदा घोडेगाव ,जेऊर . नगर ,रुईछत्तीस ,मिरजगाव, जातेगाव ,देवीचा माळ करमाळा ,टेंभुर्णी मार्गे मजल दरमजल करत दिंडी 14 रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी दिंडी चार दिवस ह भ प गणेश महाराज परचुंडे नागरविश्वनिवास पेट्रोल पंपाशेजारी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथील श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिराला भव्य प्रदक्षिणा होणार असून द्वादशीच्या दिवशी ह भ प पंडित महाराज भुतेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन दिंडी पुन्हा चांदा येथे येणार आहे.
यावेळी दिंडीचे आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केले असून दिंडीत वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता अगोदरच सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
दिंडीत चालताना वारकऱ्यांना मोजके अत्यावश्यक साहित्य सोबत घेता यावे या हेतूने चांदा येथील संकेत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अरुण विधाटे यांनी ४०० बॅग वारकऱ्यांना भेट दिल्या. हभप पंडीत महाराज भुतेकर यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले.
Post a Comment