शेवगाव : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे मोनिका राजळे यांचे नाव अंतिम समले जात आहे. मात्र महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार असेल यावर सध्या चर्चांचा खल सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यात संपर्क अभियान वाढवले आहे. याबरोबर मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्या सर्वांच्या समस्या जाणून घेत आहे. शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मतदारांच्या संपर्कात असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत तेच उमेदवार राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही संपर्क अभियान वाढवले आहे. तेही शेवटची निवडणूक म्हणून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अद्यापही गुलदस्तात आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. काकडे यांनी तालुक्यात संपर्क वाढवले असून सत्ताधारी व विरोधकांवर आरोप करण्यास सुरवात केली आहे. आमदार मोनिका राजळे यांनी दहा वर्षात काय काम केली हे त्या भाषणातून विचारत आहे.
तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव न घेता दहा वर्षे त्यांनी काय काम केले अशी टीका काकडे यांनी केलेली आहे. काकडे यांचे टीका टिपणीमुळे शेवगाव- पाथर्डीतील राजकीय वातावरण चांगले तापले आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे आता तरी चित्र दिसून येत आहे.

Post a Comment