अमर छत्तीेसे
श्रीगोंदा : शिक्षकांमध्ये पुरस्कारांचे मिळविण्याचे पेवच आता फुटलेले आहे. यामुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांमध्ये काही एजंट तयार झालेले असून ते मान-सन्मानासाठी कोण आग्रही असतो, हे शोधून त्यांना विकतचे पुरस्कार देत आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा गावा व परिसरात सत्कार समारंभ ठेवत आहे. ही सर्व कामे पैसे घेऊन किंवा कमीशन बेसवर केली जात आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषद प्रशासनासह राज्याचे पुरस्कार वगळता गुरुजींना मिळणारे इतर काही पुरस्कार विकतचे असल्याची चर्चा खुद्द गुरुजींमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यात सध्या पुरस्कार मिळविण्याची काही शिक्षकांमध्ये स्पर्धा सुरु झालेली आहे. एकाच घरातील दोघांनाही एकाच वेळी पुरस्कार मिळल्याच्या घटना घडलेल्या आहे. आपल्या सहकाऱ्याला मिळतो, तर आपल्याला का पुरस्कार मिळत नाही, याची इरशा आता शिक्षकांमध्ये निर्माण होऊ लागलेली आहे. त्यामुळे आता हे पुरस्कार विक्री केंद्र अऩेकांनी सुरु केलेले आहे. या पुरस्कार विक्री केंद्रातून एक लाॅट पुरस्कार दिले जात आहे. या पुरस्कारापोटी बिदागी घेतली जात आहे.
हे विकतचे पुरस्काराची चर्चा आता सर्वासामान्यांमध्ये झालेली आहे. यामुळे गुरुजींची प्रतीम मलीन होऊ लागलेली आहे. यावर आता शासनाने कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. विकतचे पुरस्कार घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश पारीत होणे महत्वाचे आहे.
विकतचे पुरस्कार घेणाऱ्या काही शिक्षकांच्या शाळांची प्रशासनाने तपासणी केल्यानंतर सत्य बाहेर येणार आहे. हे पुरस्कार्थी शाळेत कमी अध्यापनाचे काम करून आपला चारचौघात कसा सन्मान होईल, यासाटी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामुळे शाळांचा दर्जा घसरत चाललेला आहे. काही शाळांमध्ये शिकविले जात नसल्याने विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. अशा परिस्थितीतही त्या शाळेतील शिक्षक आदर्श शिक्षकाचा पुरस्कार घेऊन समाजात सन्मान मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये सुरु आहे.
प्रत्येकाने आता कामाच्या बदल्यात मिळणाराच पुरस्कार स्वीकारील, असा निश्चय केला तर विकत देण्यात येणारे पुरस्कार थांबण्यास मदत होईल. परंतु त्यासाठी आता जनजागृती होणे गरजेचे आहे. विकतच्या पुरस्काराचा सन्मान सोहळा करण्याऐवजी त्या पुरस्कार्थीकडे प्रत्येकाने कानाडोळा केला तर निश्चितच आगामी काळात कोणी विकतचे पुरस्कार घेणे बंद होईल. परिणामी पुरस्कार विकणाऱ्यांची संख्याही कमी होऊन जाईल.
यासाठी आता सर्वांचा निश्चय केला तर डागाळलेली आता शिक्षकांची प्रतीम चांगली होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येकानेच आपल्याला पुरस्कार नको म्हणून काम करणे महत्वाचे आहे. कष्टाचे फळ प्रत्येकाला मिळत असते. त्यासाठी वेळेची वाट पहावी लागते. विकतचे पुरस्कार घेऊन सन्मान करून घेण्यापेक्षा काम करून पुरस्कार मिळविण्यात मोठा आनंद असतो. या पुरस्काराचे स्वागतही तितक्यात मोठ्या जोमाने होत असते.

Post a Comment