नगर ः राज्य सरकारने गुरुवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केले. यामध्ये नगर जिल्ह्याने छाप पाडली आहे. येथील धनुर्विद्याच्या प्रशिक्षिका डॉ. शुभांगी रोकडे व वेटलिफ्टींग खेळाडू कोमल वाकळे यांना २०२२-२३चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. शुभांगी रोकडे या अहमदनगर जिल्हा धनुर्धारी संघटनेच्या अध्यक्ष असून, त्यांनी आजवर ४०० ते ४५० राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. धनुर्विद्या क्रीडा प्रकारात पीएच. डी. मिळवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू महाराष्ट्र राज्याच्या विविध अस्थापनेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा येथे क्रीडा प्रशिक्षिका म्हणून अनेक वर्षे कार्य केले आहे.
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कोमल वाकळे हिने २०११ मध्ये वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या सरावास सुरुवात केली. कोमल हिने राष्ट्रीय विक्रम बेस्ट स्नॅच १०५ किलो, बेस्ट क्लीन ॲण्ड जर्क १२५ किलो, नॅशनल गेम्स सलग दोन स्पर्धेत सुवर्णपदक, वरिष्ठ नॅशनल चॅम्पियनशिप तीन सुवर्ण, चार रौप्य, एक ब्राँझ पदक मिळविले आहे. खेलो इंडिया लिग दोन सुवर्ण, कोमलच्या वाटचालीत शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे योगदान आहे.
या दोन खेळाडूंनी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. या दोन पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या वैभवात आणखीच भर पडलेली आहे.

Post a Comment