नगर ः कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपमधून होत आहे. याबाबत भाजपचे शिष्टमंडळ लवकरच मुंबईला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार राम शिंदे व रोहित पवार यांच्या लढत झाली होती. या मध्ये राम शिंदे यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर राम शिंदे यांचे पूर्नवसन करण्यात आलेले असून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आलेली आहे. त्यांच्या या आमदारकीचा अजून चार वर्षांपेक्षा कालावधी बाकी आहे. त्यामुळे त्यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्याऐवजी मधुकर राळेभात यांना पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
राळेभात यांनी या अगोदर राष्ट्रवादी त्यानंतर शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्यांना या पक्षातील कार्यकर्ते चांगले माहिती आहे. त्याचा फायदा त्यांना उमेदवारी दिल्यानंतर विजयासाठी फायद्याचा ठरणार आहे. तसेच पवार गटात अनेकजण नाराज आहेत. राळेभात यांना आमदारकीची संधी दिल्यानंतर तेही पक्षात येतील त्याचा फायदा भाजपला होणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे राळेभात यांनाच पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कार्यकर्त्यांमधून मागणी होत असून त्यावर पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. श्रेष्ठींनीही कोणताही निर्णय घेताना पक्षाचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीत जी चूक झाली तशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी आता पक्षाच्या नेत्यांनी सर्व बाजूंनी निर्णय घेताना काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment