प्रयागराज ः उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली.
मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर १० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री एकच्या सुमारास घडली. जखमींना याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आहे. तत्काळ मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.
त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. काही बॅरिकेट तुटले. एकाच ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाल्याने हा प्रकार घडला. पोलिसांनी काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार या घटनेकडे लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment