कर्जत : राज्यातील आघाडी सरकार ज्या पध्दतीने पायउतार झाले तसाच काहीसा प्रकार कर्जत नगरपंचायतीत भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे. सत्ताधारी गटातील तब्बल ११ नगरसेवक आपल्या गोटात घेत विद्यमान नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला असून नगरसेवक आमदारांप्रमाणेच सहलीला गेलेले आहेत. राज्यात आता ही परंपराच सुरू झाल्याने मतदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक सहलीसाठी गेल्याचे समजताच सोमवारी कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी पत्रकार परिषदे घेतली आहे. राऊत म्हणाल्या आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत फक्त आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेसाठी बसा असे आवाहन त्यांनी केेले.
त्या म्हणाल्या, आपला कार्यकाळ हा अडीच वर्षाचा होता परंतु शासनाकडून तो कार्यकाळ वाढवण्यात आला. सन 2022 मध्ये कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या कार्यकाळ ठरविण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा आणि उपनगराध्यक्ष यांचा सव्वा वर्षाचा होता परंतु शासनाकडून आमचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याने अडीच वर्षानंतर काही इच्छुक नगरसेवक होते. त्यांची या पदाकरता महत्त्वाकांक्षा असल्याने आम्ही ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास तयार होतो. उपनगराध्यक्ष पदाचा काळ सव्वा वर्षाचा असल्याने त्यांनी राजीनामा दिला नाही.
आमचा कार्यकाळ शासनाकडून वाढविण्यात आला परंतु आम्ही आजही राजीनामा द्यायला तयार आहोत. सर्व नगरसेवकांनी आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेला बसावे जो निर्णय होईल तो होईल.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नामदेव राऊत म्हणाले की, नगरपंचायतची निवडणूक आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली झाली असून या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 15 नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ही दोन्ही नावे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केली होती.
तसेच सदर पदांचा कालावधी ही निश्चित करण्यात आला होता यात नगराध्यक्षा यांचा कालावधी अडीच वर्षे तर उपनगराध्यक्ष यांचा कालावधी सव्वा वर्ष निश्चित करण्यात आला होता. उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी सव्वा वर्षात राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही. तर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा कालावधी अडीच वर्षाचा होता परंतु शासनाकडून त्याला मुदतवाढ मिळाली.
राजीनाम्याची जबाबदारी ही गट नेत्यांकडे देण्यात आली होती. त्यांनी अजेंडा काढून सदरची जबाबदारी पार पाडायला हवी होती. परंतु तसे न करता आमदार रोहित पवार यांच्याशी कुठलीही चर्चा न करता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही राजीनामा द्यायला आजही तयार आहोत त्यांनी येऊन आमदार रोहित पवार यांच्याशी बैठक करावी. असे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले.
आमदार राम शिंदे आमच्यावर प्रेम व्यक्त करत आहे. असे उपरोधिक विधान नामदेव राऊत यांनी करून सन 2009 ते 2019 पर्यंत आम्ही राम शिंदे यांचे प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे आश्वासन शब्द दिले परंतु ते शब्द पाळले नाहीत. त्यांनी हे शपथ वाहून सांगावे. परंतु पक्षात असताना फक्त मी घेतलेल्या मेळाव्यामुळे पराभव झाला असे ते म्हणत आहेत. नगरसेवक सहलीवर जाणे हे राम शिंदे फक्त माझ्यावर द्वेषातून हे करीत आहेत. असे राऊत म्हणाले.
नगरपंचायतच्या कारभारात माझा हस्तक्षेप आहे असे ते म्हणत असताना मी स्वतः नगरपंचायत चा एक विद्यमान सदस्य असून मी जर काम करत असेल तर त्याला अडचण काय? या उलट उपनगराध्यक्षा हे कामकाजात कुठलीही जबाबदारी पार पडत नाहीत असे नामदेव राऊत यांनी सांगितले.
Post a Comment