कर्जत : येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ नगरसेवक तीन काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभापती तथा भाजपचे नेते आमदार राम शिंदे यांच्यासोबत रविवार रात्री गुप्त बैठक केली.
या बैठकीत कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का मानला जात आहे या बैठकीबद्दल राम शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे
कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत भाजपच्या प्राध्यापक राम शिंदेच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या.
नगराध्यक्षपदी उषा राऊत तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजी उफाळून आली.
दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा राम शिंदे यांना साथ देऊन कामे मार्गी लावत विकास निधी मिळवायचा असा निर्धार करत रविवारी रामनवमीचे औचित्य साधत अकरा नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला.
याावर आता आमदार रोहित पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ही बैठक होत असताना याची भनक पवार गटाला लागलेली नाही. त्यामुळे तालुक्यात पवार यांची यंत्रणा सुस्तावली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
कर्जतमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेपासूनच या हालचाली सुरू होत्या अशी चर्चा पवार गटात सुरू आहे. पवार गटातूनच काहींची त्या नगरसेवकांना साथ असल्याची चर्चा आहे.
Post a Comment