कर्जतच्या नगराध्यक्षपदी कोण? घुले, शेळके, शेलार, कुलथे अन् पिसाळ यांची नावे चर्चत...

कर्जत ः राज्यात महाविकास आघाडी सरकार ज्या पध्दतीने पायउतार झाले. त्याच पध्दतीने कर्जत नगरपंचायतीवरील आमदार रोहित पवार यांच्या सत्तेचा पायउतार झालेला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पाच नगरसेवकांची नावे सध्या चर्चेत आहेत.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. 


या महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी भाजपने शिवसेनेतील नाराजांशी संपर्क साधून त्यांना एक गट तयार करून बाहेर पडण्यास भाग पाडल्याची राजकीय वर्तुळात आजही चर्चा आहे. शिवसेनेतील नाराजांचा एक गट बाहेर पडून त्यांनी राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आणले. 

त्यानंतर आघाडी सरकारमधील सर्वच पक्षांनी सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तशीच परिस्थिती कर्जतमध्ये झाली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ता आली होती. 

सर्वानुमते उषा राऊत यांनी वर्णी नगराध्यक्षपदी लावण्यात आली होती. तेव्हापासून त्या नगराध्यक्ष म्हणून कामकाज पहात होत्या. परंतु नगराध्यक्षपदासाठी काहीजण इच्छुक असल्याने नाराज होऊन त्यांनी एक गटच तयार करून बंड करून विरोधकांशी हात मिळवणी करून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला. 

यावर आज निर्णय होणार होता. त्यापूर्वीच राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे विरोधकांचा विजय झालेला असला तरी त्यांना अविश्वास ठरावाने राऊत यांना पायउतार करण्याचे त्यांचे स्वप्न भंग  झालेले आहे.

अविश्वास ठऱाव दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तीन नगरसेवक स्पर्धेत आहेत. त्यातील कोणाची वर्णी लागणार आहेत. नगरसेविका रोहिणी घुले, छाया शेलार व ज्योती शेळके, ताराबाई कुलथे, मोहिनी पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. 

यामध्ये नगराध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. या पाचमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व तसेच महिला बालकल्याण समितीचे सभापती अशी वर्णी लागणार असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरु आहे.

भाजपने कर्जत नगरपंचयातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी मोठा खटाटोप केलेला आहे. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकाला नगराध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आता सभापती राम शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने मुख्यंत्रीपद जसे शिंदे गटाला दिले होते. त्याची पुनर्रावृत्ती कर्जतमध्ये व्हायला नको. नगरपंचायतमध्ये सत्ता मिळविण्यासाठी जो खटाटोप केलेला आहे. त्याचे नगराध्यक्षपदाच्या रुपाने भाजपने फळ घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post