पाथर्डी : सुगंधी तंबाखूच्या छाप्यातील कारवाई सौम्य करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षकासाठी दीड लाख रुपये स्वीकारून उर्वरित रकमेच्या तडजोडी अंती ३० हजार रूपये स्वीकारल्या प्रकरणी मध्यस्थी करणाऱ्यास अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८) असे आरोपीचे नाव आहे.
पाथर्डी पोलिसांनी ४ एप्रिल रोजी एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला होता. या ठिकाणी सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्याचे साहित्य जप्त केले होते. ही कारवाई सुरू असताना पानटपरी चालकाच्या भावाला एका ओळखीच्या व्यक्तीने शिक्षक विजय गर्जे यांना भेटण्यास सांगितले.
गर्जे यांची भेट घेतल्यावर सहायक पोलिस निरीक्षकांसाठी दीड लाख रूपये वेगवेगळ्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले. त्यानंतर तक्रारदाराने भावाच्या जामीन अर्जाबद्दल चौकशी केली असता, गर्जे यांनी राहिलेले ५० हजार रूपये द्या, असे म्हटले.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
या विभागाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये गर्जे यांनी तडजोडीअंती ३० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment