जीएस महानगर बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले...

पारनेर : जीएस महानगर बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शुक्रवारी (ता. २) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागांसाठी ९६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 


सुमन गुलाबराव शेळके, गीतांजली उदय शेळके व स्मिता गुलाबराव शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. निवडणुकीत नणंद भावजयीच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्व. गुलाबराव शेळके व स्व. उदय शेळके यांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुमन व स्मिता शेळके, तसेच स्व. उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. एक जूनला मतदान होणार आहे. दोन जूनला मतमोजणी होणार आहे.


सर्वसाधारण प्रवर्ग मतदारसंघात १४ जागांसाठी ६२, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील १ जागेसाठी १६, महिला राखीव प्रवर्ग मतदारसंघातील २ जागांसाठी १२, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग मतदारसंघातील १ जागेसाठी ३, भटक्या विमुक्त प्रवर्ग मतदारसंघातील १ जागेसाठी ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १६ मे रोजी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असून, त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होईल.

२९ एप्रिलला अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ३० एप्रिलला अर्जाची छाननी झाली, तर शुक्रवारी (ता.२) दुपारी छानणीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

छाननीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात २०, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात १० अर्ज बाद झाले. त्यामुळे माघारीनंतर कोण निवडणुकीत रिंगणात राहते याकडेही लक्ष लागले आहे.

निघोज परिसरातील मळगंगा देवीचा आशीर्वाद घेऊन पॅनलचे नामकरण व प्रचाराचा शुभारंभ रविवारी (ता.४) सकाळी १० वाजता होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post