पुणे : राज्यात सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा सुरू असतानाच हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा गाठलेला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणांनी उपाययोजना ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उर्वरित विदर्भासह नाशिक जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. राज्यात पावसाच्या शक्यतेसोबतच उष्णतेची तीव्रताही कायम आहे.
अकोला येथे सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, सोलापूरमध्ये 44 अंशांपेक्षा जास्त, तर धुळे येथे 43 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे.
याशिवाय जेऊर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आणि वाशीममध्ये 42 अंशांपेक्षा जास्त तापमान आहे. पुणे, सांगली, सातारा, परभणी, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळमध्ये 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रासह देशातील अन्य भागातही हवामान बदलते आहे. उत्तर भारतातील हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Post a Comment