अहिल्यानगर ः अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही गावात दाणादण उडवून टाकली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसानझाले आहे.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा गाठलेला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणांनी उपाययोजना ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, नेवासे, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वनकुटे, वडगाव सावळाला, ढवळपुरी भागात गारांसह सुमारे एक तास पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, संत्रा, पपई या फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वनकुटे परिसरातील गावांमध्ये सर्वाधिक अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह या भागात गारा पडल्या. या भागातील आंबा, संत्रा, पपई, कलिंगड, खरबूज आदींसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, वाघाचा आखाडा या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नेवासे तालुक्यातील सोनई परिसरात ही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नगर तालुक्यातील हिवरेझरे परिसरात पाऊस झाला.
Post a Comment