अहिल्यानगर : मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद वर्ग 3 व 4 कर्मचार्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. 13 ते 15 मे दरम्यान या बदल्या होणार असून तसे वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे.
दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या होत असतात. या बदल्यांची प्रक्रिया करण्यापूर्वी प्रत्येक विभागाच्या बदल्यांसाठी पात्र असणार्या कर्मचार्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून, त्यावर हरकती घेतल्यानंतर पात्र कर्मचार्यांची अंतिम यादी तयार करून ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.
यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार कर्मचार्यांच्या विनंती आणि प्रशासकीय बदल्या केल्या जातात. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर बदल्या होतील, असे वाटत होते. मात्र शासनाकडून काहीही आदेश आले नाहीत. त्यामुळे राज्यभर या बदल्या रखडल्या.
मात्र, यंदा बदल्या करण्यात येणार असून त्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने विभागनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्यालयातील व तालुक्यातील रिक्त पदे भरताना पदांचा समतोल राखण्यात यावा. तसेच आदिवासी दुर्गम भागातील पदे प्राधान्याने भरावीत.
त्यानंतर नंतर विनंती बदली व अखेर प्रशासकीय बदलीने तालुकानिहाय पदांचा समतोल राखण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिल्या आहेत. तालुकास्तरावरील बदल्या 19 ते 23 मे या कालावधीत करण्यात येतील, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
बदल्यांचे वेळापत्रक : 13 मे रोजी सकाळी 10 ते 11- कृषी विभाग. त्यानंतर 11 ते दुपारी 12.30- महिला व बालकल्याण. 12.30 ते 1.30 – लघु पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभाग, 2.30 ते 3.30 – बांधकाम विभाग आणि 3.30 ते 5.30- शिक्षण विभाग. 14 मे रोजी सकाळी 10 ते 11.30- अर्थ विभाग. 11.30 ते 1.30 – सामान्य प्रशासन विभाग आणि दुपारी 2 ते 6 – ग्रामपंचायत विभागातील बदल्या होणार आहेत. 15 मे रोजी सकाळी 10 ते 11.30- पशुसंवर्धन विभाग आणि त्यानंतर 11.30 ते 6 – आरोग्य विभागातील बदल्या होणार आहेत.
Post a Comment